Chava Book Review In Marathi | छावा पुस्तक सारांश

Chava Book Review In Marathi- नमस्कार मित्रांनो, 360PDFs ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज आपण छावा या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.हे पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे ते एक महान लेखक आहेत त्यांनी फक्त मराठी साहित्य लिहिले हे पुस्तक 1979 ला प्रथम प्रकाशित झाले होते तरीही हे पुस्तक वाचताना तुम्हाला अंगावर रोमांच येतील. हे पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. ते दोघेही भारतीयांसाठी देवासारखे आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईपासूनचे पहिले पुत्र होते.
Overview Of Chava Book In Marathi | छावा पुस्तक थोडक्यात माहिती
भाषा | मराठी |
लेखक | शिवाजी सावंत |
Category | चरित्र |
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन |
पृष्ठे | 853 |
वजन | 406 ग्रॅम |
Binding | पेपरबॅक |
Man Mai Hai Vishwas Book Price | Amazon |
Chava Book Summary In Marathi | छावा पुस्तकाबद्दल माहिती
“छावा” या दोन अक्षरातच सर्व सार सामावलंय कादंबरीचं. सिंहाच्या पोटी छावाच जन्म घेतो नि जन्माला आल्यापासून ते अखेच्या श्वासापर्यंत तो सिंहच राहतो. संभाजीराजे सुद्धा असेच एक सिंहपुत्र होते. ज्या आदरणीय शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, मराठ्यांचे नाव देशात उज्ज्वल केले, हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, त्या मराठी स्वराज्याच्या मंदिरावर महाराजांच्या या पुत्रानं स्वतःच्या कर्तृत्वाने, बलिदानाने सुवर्ण कळस चढवला. या अशा अतिशय सुंदर कादंबरीचा आलेला अनुभव Chava Book Review In Marathi मधुन तुमच्यासमोर मांडत आहे.
संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे ते पुत्र. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या संभाजीराजांना जीवनाचे धडे परिस्थितीनेच शिकवले. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगांनी ते काहीतरी शिकत गेले, स्वतःला घडवत गेले. परिस्थितीच्या प्रत्येक तडाख्यातून तावून-सुलाखून निघूनच त्यांच्या आयुष्याचा काळ हा सुवर्णकाळ बनून झळाळून उठला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्यावर पुरंदरच्या तहासाठी मुघलांकडे जामीन राहायची वेळ आली, पण तरीही ते डगमगले नाहीत. जसे महादेवास सर्वांच्या कल्याणासाठी विष पचवावे लागले, तसेच हे विष सुद्धा जनतेच्या कल्याणासाठी संभाजीराजांनी हसत हसत पचविले. त्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा, रयतेच्या कल्याणाचा वसा घेतलेल्या मनाचा याहून मोठा पुरावा काय असेल?
ज्या वयात आई-बाबांचं प्रेमाचं, सुरक्षिततेचं छत्र सोडून दूर जाण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही त्या वयात संभाजीराजे जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला शत्रूच्या गोटात जामीन म्हणून ठेवायला तयार झाले होते. पित्याच्या एका शब्दाखातर एवढं साहस करणारा पुत्र विरळाच. ज्या दैवानं त्यांना जन्मजातच लढवय्या वृत्ती, मुत्सद्दी राजकारणी मन दिल होत त्याच दैवानं त्यांना एक कवी मनही बहाल केलं होत. आजूबाजूची परिस्थिती पाहून जसे ते नवीन काहीतरी शिकत होते, तसेच त्यांच्यातला कवीही मोठा होत गेला नि यातूनच निर्मिती झाली बुद्धभूषण या ग्रंथाची.
राजकारणावर आधारित असा हा ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहला. याच ग्रंथामध्ये असलेल्या चार ओळी ज्या माझ्या मनाला अतिशय भिडल्या त्या अर्थासह खाली देत आहे. कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥ अर्थ – जेव्हा वाईट कालरूपी भुजंग, जनतेला त्रास देण्यासाठी, धर्माचा नाश करण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा सर्व जनतेला त्या वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं एक युगपुरुष अवतरला, त्या महाराजांचा सदैव विजय होत राहूदे. या ओळींमधूनच आपल्याला समजून येईल कि संभाजीराजांचं आपल्या पित्यावर किती प्रेम होत, त्यांच्याबद्दल किती आदर होता.
हे पुस्तक वाचल्यावर संभाजी महाराजांची ओळख अनेक रूपातून झाली. युवराज, एक शूर लढवय्या, कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा वीर, धोरणी राजकारणी, प्रजाहितदक्ष राजा, तरल संवेदना जाणून त्या शब्दबद्ध करणारा कवी, कर्तव्यनिष्ठ पुत्र, प्रेमळ भाऊ नि आदर्श पती. पण या सर्वातही त्यांची खरी ओळख मला पटली ती माणूस म्हणून. मराठा साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर कधी अन्य्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आप्तजणांना विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या, पण निरपराध्यांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी, कोणत्याही कैद्याला कधी त्यांनी सक्तीनं धर्मबदल करायला लावला नाही.
औरंगजेबाच्या कुटील-कारस्थानी महासत्तेसमोर त्यांचं हे माणूसपण निश्चितच निविर्वादपणे मोठं वाटलं. संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा खरतर चुकी त्यांच्यापेक्षाही जास्त परिस्थितीची होती. सोयराबाई आणि दरबारातील काही महत्वाचे मंत्रीगण यांनी संभाजीराजांविरुद्ध अशी स्थिती निर्माण केली. इतकंच काय तर शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा कट केल्याचा आरोप हि त्यांच्यावर लावला. सततच्या या कट कारस्थानांमुळे नाईलाजाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना या सर्वांपासून दूर ठेवलं, आपल्या दक्षिण भारतातील स्वारींसोबतही संभाजीराजांना त्यांना नेता आलं नाही. आणि या सर्वातूनच कळत-नकळत संभाजीराजांचं मन दुखावलं गेलं. त्यांनी बंड पुकारलं खर पण हा त्यांचा उठाव शिवाजीमहाराजांविरुद्ध किंवा स्वराज्याविरुद्ध कधीच नव्हता. त्यांचा लढा हा स्वतःविरुद्धच होता.
केवळ युवराजपणामुळे नव्हे तर एक स्वतंत्र व्यक्ती, या स्वराज्यासाठी झगडणारा एक मावळा म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची ती धडपड त्यांच्या दृष्टीनं योग्यच होती. पण त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग मात्र चुकला. या मार्गावरून ते परतलेही पण तोपर्यंत बरंच काही घडून गेलं होत. त्यांच्या नावाच्या खऱ्या खोट्या कितीतरी बातम्या एव्हाना मराठी मुलखात पसरल्या होत्या. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गमावलेल सर्वकाही परत मिळवलंही कारण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या त्या छाव्याला औरंगजेबाच्या सामर्थ्याची भीती कधी वाटलीच नाही. पण दोन तुटलेली दोरखंड जोडताना जशी एक गाठ मध्यभागी राहते तशी गाठ राहिली होती. बरेच आप्तस्वकीय, विश्वासू लोक औरंगजेबाच्या भीतीनं म्हणा किंवा त्यांनी दाखवलेल्या आमिषानं म्हणा संभाजीराजांना फितूर झाले.
पुस्तकाचा शेवट वाचताना तर अक्षरशः रडू कोसळते. सिंहासमान आयुष्यभर लढणारा तो वीर फसवला गेला तो स्वकीयांकडून. ज्याला शत्रूच भय कधीच वाटलं नाही त्याला आपल्याच माणसांनी फुटकळ विलोभनांपायी फसवलं. त्या महान राजाची जी विटंबना औरंगजेबाने केली त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. त्यांची विदूषकाचे कपडे घालून मिरवणूक काढली, जीभ कापण्यात आली, डोळे सुद्धा काढले पण इतकं सगळं होऊनही तो छावा औरंगजेबापुढे नमला नाही.
खरतर संभाजी महाराज विरुद्ध औरंजेब असं युद्ध या पुस्तकातून जाणवलंच नाही. संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोन व्यक्ती नसून प्रवृत्ती असाव्यात इतक्या त्या एकमेकांशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. आणि खरचं त्या दोन प्रवृत्तीच होत्या, तो लढा होता चांगल्या वृत्तीविरुद्ध वाईट वृत्तींचा. औरंगजेबाचं सैन्य, त्याची सत्ता निश्चितच मोठी होती. पण त्या मागचा इतिहास मात्र काळाकुट्ट होता. औरंगजेब आणि संभाजीराजांना माणुसकीच्या पारड्यात तोलायचं झालं तर निविर्वादपणे महाराजांचं पारडं विजयी ठरलंय पाठोपाठ असंही वाटतंय कशाला करायची हि तुलना? कारण स्वतःच्या जन्मदात्याला कैदेत टाकणारा, सख्ख्या भावाला जीवे मारणारा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा औरंगजेब आणि स्वतःच्या पित्याचा एक शब्दही खाली पडू न देणारे, सावत्र आईनं ज्यांच्या मृत्यूचा कट रचला, ज्यांच्या चारित्र्यावर कलंक लावायचा प्रयत्न केला तरीही ज्यांनी तिला माफ केलं, स्वतःच्या सावत्र भावाचा जराही दुस्वास न करता त्याच्यावर निर्भेळ प्रेम करणारे संभाजीराजे यांची तुलना होऊच शकत नाही.
पण तरीही हि तुलना कुठंतरी गरजेची वाटली ती यासाठी कि माणूस म्हणून जगताना आपण जरी चुकलो तरी ती चुकी सुधारून सुद्धा आपल्याला आपल्या स्वबळावर जगासाठी प्रेरणास्रोत बनता येत. अनंत कालापर्यंत समाजाच्या मनावर राज्य करता येत. त्यांचे आदर्श होऊन त्यांना मार्ग दाखवता येतो. कारण संभाजीराजांना माहित होत त्यांच्या वाहून गेलेल्या रक्ताच्या एक एक थेंबातुन पुन्हा असे लाखो संभाजी जन्माला येतील जे या मातृभूमीचे सगळ्या वाईट प्रवृतींपासून रक्षण करतील. तो गेला पण जगाला एक कायमची शिकवण देऊन गेला. कितीही खडतर परिस्थिती आली तरी हार न मानता लढायची, कारण चुकतो तो माणूस असतो पण त्याची माणुसकी तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तो या चुकांपासुन काहीतरी शिकतो.
संभाजीराजांची हीच शिकवण मला या पुस्तकातून मिळाली. आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे आपल्याला. कदाचित त्या निर्णयांमुळे तुम्ही चुकाल पण त्यातून सुद्धा काहीतरी शिकाल. आपल्या ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा कारण असं बलिदान कधीच व्यर्थ जात नसत. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला जगण्याची नवीन आशा मिळते नि आपलं बलिदान त्यामुळं कृतार्थ होत. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला विनम्र अभिवादन त्यांची शिकवण सदैव आपल्या मनात राहूदे हीच अपेक्षा. जयतु शंभूराजे!!
वाचा – अग्निपंख पुस्तक सारांश
Information About The Author Shivaji Sawant | लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दल माहिती
शिवाजी सावंत (31 ऑगस्ट 1940 – 18 सप्टेंबर 2002) हे मराठी भाषेतील भारतीय कादंबरीकार होते. ‘मृत्युंजय’ ही प्रसिद्ध मराठी कादंबरी लिहिल्याबद्दल त्यांना मृत्युंजयकार (म्हणजे मृत्युंजयचा निर्माता) म्हणून ओळखले जाते. 1994 मध्ये मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक होते.
लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर मध्ये 1940 साली झाला. कोल्हापूर मध्येच 20 वर्षे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याच प्रमाणे त्यांनी पुण्यात महाराष्ट्राच्या शासनात लोकशिक्षण मासिका करता सहा वर्षे काम पाहिले. भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल सावंताना पूर्वी पासूनच अभिमान आणि जिज्ञासा होती. त्यामुळे माझा भारत म्हणजेच महाभारत हे समीकरण त्यांच्या मनात एकदा पक्क झाल्यानंतर त्यांनी महाभारताचा अभ्यास चालू केला.
त्या दरम्यान त्यांनी कथानायक कर्णाची ओळख व्हावी म्हणून मध्य भारत, उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा प्रदेशांमध्ये स्वतः जाऊन तेथे अभ्यास केला. संदर्भ गोळा केले. आणि इतक्या अथक प्रयत्नानंतर हि कादंबरी आज तुम्हा आमच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
Conclusion- Chava Book Review In Marathi
राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला.
लेखकाने संभाजीराजांच्या शौर्याला, त्यागाला पुरेपूर न्याय दिला आहे. तत्कालीन स्वराज्याचं वर्णन अप्रतिम पद्धतीने केलं आहे. या पुस्तकातून सध्या बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये संदर्भ घेतल्याचं जाणवतं. पुस्तकाचा विषय, भाषेचा लहेजा, प्रसंगवर्णन, पराक्रम, त्याग, लेखकाचा अभ्यास आणि निष्ठा या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता छावा हे मराठी साहित्यातील शिरोमणी आहे. खंत हीच वाटते की शंभूराजांचा बलिदान लोकांपर्यंत पोहोचलं नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने छावा एकदा तरी जरूर वाचावे आणि हा इतिहास इतरांपर्यंत देखील पोहोचवावा.
वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi
हे पुस्तक वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
FAQ- Chava Book Review In Marathi
1. छावा पुस्तक म्हणजे काय?
– छावा हे एक मराठी ऐतिहासिक कार्य आहे जे छत्रपती शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले यांची कथा सांगते. पुस्तकाचा सारांश. शिवाजी आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांच्या पोटी जन्मलेल्या संभाजीवर शिवाजीने सुरू केलेल्या मराठा साम्राज्याची धुरा सोपवण्यात आली होती.
2. छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
– शिवाजी सावंत हे छावा या पुस्तकाचे लेखक आहे.
3. छावा हे पुस्तक आहे कि कादंबरी आहे ?
– छावा ही एक मराठी ऐतिहासिक कादंबरी आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांची कथा सांगते.
Thank You,
आमच्या इतर पोस्ट,
- Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
- Ek Hota Carver Book Review In Marathi
- Ikigai Book Review in Marathi
- The 7 Habits Of Highly Effective People Review in Marathi
- Pavankhind Book Review In Marathi
- Think And Grow Rich Review in Marathi
- Shyamchi Aai Book Review In Marathi
- Yayati Book Review In Marathi
- The Secret of Millionaire Mind Review in Marathi
- The Magic Book Review in Marathi
- Believe in Yourself Book Review in Marathi
One thought on “Chava Book Review In Marathi | छावा पुस्तक सारांश”